महाविकास आघाडीची निवडणूक तयारी जोमात! बुलढाण्यात ९० टक्के जागांवर एकमत, उर्वरित निर्णय वरिष्ठ नेत्यांकडे...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर मंथन झाले. ही महत्त्वाची बैठक ७ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात पार पडली. या बैठकीत बहुतांश जागांवर म्हणजेच सुमारे ८५ ते ९० टक्के ठिकाणी एकमत झाले असून, मतभेद असलेल्या काही ठिकाणांचा निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत.
बुलढाणा शहरात झालेल्या या बैठकीत महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष — काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) — यांच्या नेत्यांनी ११ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सविस्तर नियोजन केले. सूत्रांच्या माहितीनुसार, एकूण २८६ नगरसेवक पदांपैकी सुमारे ८५ ते ९० टक्के ठिकाणी उमेदवारीवर एकमत झाले आहे. उर्वरित काही नगरपालिकांबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरील बैठकीत घेतला जाणार आहे.

या बैठकीस माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, अॅड. जयश्री शेळके, काँग्रेसचे माजी आमदार राजेश एकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, आणि प्रसेनजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीदरम्यान सर्व नेत्यांनी "महाविकास आघाडीच्या बॅनरखाली एकत्र लढावे" असा एकमुखी निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या काही नगरपालिकांमध्ये मतभेद शिल्लक आहेत, त्याबाबतचा अंतिम निर्णय डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. राहुल बोंद्रे, प्रा. नरेंद्र खेडेकर, आणि जालिंधर बुधवत हे नेते संयुक्तरीत्या घेणार आहेत. या मतभेदित जागांची संख्या अत्यल्प असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

बैठकीस शिवसेना संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शिवसेना प्रवक्त्या अॅड. जयश्रीताई शेळके, आ. धीरजभाऊ लिंगाडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. राहुल भाऊ बोंद्रे, माजी आमदार राजेश एकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश भाऊ शेळके, प्रसेनजीत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, लक्ष्मणदादा भुमरे, संतोष रायपुरे, डी. एस. लहाने, भास्करराव काळे, रमेश दादा कांयदे, राजू पाटील, गजानन धांडे आदी मान्यवर उपस्थित होते.