पाेळा सणावर लम्पीचे सावट; बैलांचा पाेळा भरवण्यावर प्रशासनाची बंदी; घरगुती पद्धतीने सण साजरा करण्याचे प्रशासनाने केले आवाहन..!
Aug 19, 2025, 14:59 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकऱ्यांच्या सर्जाराचा महत्वाचा सण असलेल्या पाेळा सणावर यंदा लम्पीचे सावट आहे. पारंपरिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेला हा सण यंदाही लम्पीच्या सावटाखाली साजरा होत आहे. याबाबत सणाच्या दिवशी बैल एकत्रित करून पोळा साजरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घरच्या घरीच आनंदात पोळा साजरा करावा लागणार आहे.
जिल्हा प्रशासनाने गुरांमधील लम्पी या चर्मरोगाचा संसर्ग पसरू नये, याची दक्षता घेतली आहे. यानुसार, जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी गुरे जमविण्यास मनाई करण्याचा आदेश जारी केला आहे. २२ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या या सणात बैल एकत्रित करून साजरा केल्यास लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने सण साध्या आणि घरगुती पद्धतीने साजरा करण्याचे, तसेच संबंधित विभागांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.
गुरांमध्ये हा रोग असल्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात व्यक्ती, संबंधित पशुपालक, शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी ढिलाई केली किंवा अडथळा आणल्यास, प्राण्यांमधील संक्रमण आणि संसर्गजन्य रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम-२००९ च्या कलम ३१, ३२ व ३३ नुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी स्पष्ट केले आहे.