कमळजा माता मंदिर वाचवण्यासाठी ‘लोणार बंद’चा एल्गार; वाढत्या पाणीपातळीविरोधात नागरिक रस्त्यावर,उपाय योजना करण्याची मागणी...

 
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  जागतिक वारसा म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून, सरोवराच्या काठावर असलेले अतिप्राचीन आणि भाविकांचे श्रद्धास्थान श्री कमळजा माता मंदिर पाण्याखाली जाण्याच्या स्थितीत आले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि मंदिराचे अस्तित्व वाचवण्यासाठी बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी ‘लोणार बंद’ पुकारण्यात आला आहे.या बंदला लोणार शहरातील व्यापाऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून १०० टक्के बंद पाळण्यात आला.
लोणार शहरातील समस्त नागरिक, व्यापारी संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने हा बंद जाहीर करण्यात आला असून, याबाबतचे लेखी निवेदन लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिले होते. कमळजा माता भक्त परिवार यांच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रात वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे मंदिराला तातडीचा धोका निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, मागील काही काळापासून लोणार सरोवराची पाणीपातळी वाढत असल्याने मंदिर परिसर जलमय होत असून, यामुळे ऐतिहासिक वारशाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुख्य मागण्या काय?
आंदोलनकर्त्यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत—

वाढत्या पाणीपातळीमुळे होणारे मंदिराचे नुकसान तातडीने थांबवावे.

पुरातत्व विभागाने कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना राबवाव्यात.

भविष्यात अशा प्रकारे वारसा स्थळांचे नुकसान होऊ नये, यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा.

विशेष म्हणजे, या विषयासंदर्भात १९ जानेवारी २०२६ रोजी तहसीलदार (तालुका दंड अधिकारी) यांनाही लेखी स्वरूपात माहिती देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

शांततेच्या मार्गाने बंद
हा ‘लोणार बंद’ पूर्णपणे शांततेच्या मार्गाने पाळला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा—जसे की दवाखाने, मेडिकल स्टोअर्स—या बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य करावे, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.दरम्यान, लोणार शहरातील व्यापाऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली.