नर–मादीसह बिबट्याची पिल्ले आढळल्याने दुधा कळंबेश्वर शिवारात दहशत; शेतातील गोठ्यात बिबट्यांचा वावर; शेतीकामे ठप्प, मजूरही फिरकले नाहीत...

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  दुधा कळंबेश्वर शिवारात नर व मादी बिबट्यासह पिल्लांचा वावर आढळल्याने परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
दुधा कळंबेश्वर रस्त्यावरील सुभाष खुरद यांच्या शेतातील गोठ्याकडे ते व त्यांचे भाऊ जात असताना, गोठ्यातून दोन बिबटे व त्यापैकी एकाच्या तोंडात पिल्लू असे तिघेजण धावत निघून जाताना त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून गोठ्याची पाहणी करण्यात आली असता, गोठ्यातच एक बिबट्याचे पिल्लू आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाला कळविण्यात आले. त्यानंतर सहायक वनसंरक्षक वैभव काकडे, घाटबोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले, वनपाल व्ही. टी. मापारे, वनरक्षक शिवनारायण पडघान, एस. टी. गायकवाड, उल्हास भोडणे, देवा पवार, वनमजूर विनोद नागरगोजे तसेच वाहनचालक नारायण मुंदरे यांच्यासह वनविभागाचा संपूर्ण चमू घटनास्थळी दाखल झाला.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची सखोल पाहणी करून बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर पिल्लू आज रात्री पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्यात येणार असून, त्यामुळे बिबट्यांनी पिल्लाला परत नेण्याची शक्यता निर्माण होईल. यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

या घटनेमुळे दुधा कळंबेश्वर शिवारात शेतमजूर कामासाठी आले नसून, कापूस वेचणी व तूर सोंगणीसह सर्व शेतीकामे ठप्प पडली आहेत. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्री शेतात जाणे धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

 
“जोपर्यंत या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात येत नाही, तोपर्यंत कळंबेश्वर–दुधा शिवारातील शेतांमध्ये विद्युत पुरवठा सुरूच ठेवावा. रात्रीच्या वेळेस शेतात जाण्याची शेतकऱ्यांना भीती वाटत आहे.”
विद्या सुभाष खुरद, सरपंच, कळंबेश्वर