गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर-प्रखर बीम लाईटला बंदी; बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, नियम मोडल्यास कारवाईचा इशारा...

 
बुलढाणा : (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विसर्जन मिरवणुकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रखर बीम लाईट तसेच लेझर बीम लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अन्वये हे निर्बंध लागू केले आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाहनांवर किंवा मिरवणुकीच्या मार्गावर लावण्यात येणाऱ्या वाद्यांमध्ये प्रखर बीम अथवा लेझर लाईटचा वापर केला जातो. मात्र, या प्रकाशामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, विशेषतः डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते.

मिरवणुकीतील भक्त तसेच विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यांवर या तीव्र प्रकाशाचा परिणाम होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. गंभीर परिस्थितीत कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याचा धोका देखील प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरण्यास प्रतिबंध केला आहे.

गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे, आयोजक आणि नागरिकांनी प्रशासनाच्या या आदेशाचे काटेकोर पालन करावे, तसेच विसर्जन मिरवणुका शांततेत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पाडाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.