कोथळी–तरोडा रस्ता गेला खड्डयात, दुरुस्तीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक; ५ जानेवारीपर्यंत डांबरीकरण करा अन्यथा  ६ पासून आमरण उपोषणाचा इशारा...

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कोथळी ते तरोडा या महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांचे रोजचे प्रवास जीवघेणे ठरत आहेत. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा ६ जानेवारी २०२६ पासून थेट रस्त्यावरच आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने प्रशासनाला दिला आहे.
यासंदर्भात संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोथळी–तरोडा रस्त्यावर सध्या प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, रस्त्यावरून जाताना अपघाताचा धोका सतत निर्माण होत आहे.

या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, काहींना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना तसेच रुग्णवाहिकांनाही या रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड अडचणी सहन कराव्या लागत आहेत. परिणामी, नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
फक्त किनारे भरले; प्रत्यक्ष रस्ता दुर्लक्षित
काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे किनारे भरून काढण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे हा उपाय तात्पुरता ठरला असून, रस्त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे, असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ५ जानेवारी २०२६ पर्यंत कोथळी–तरोडा रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण न झाल्यास, ६ जानेवारी २०२६ पासून संबंधित रस्त्यावरच आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे. या रस्त्याची दुरुस्ती ही केवळ विकासाचा नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याचे सांगत, प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे.निवेदनावर महेंद्र जाधव, अमोल मोरे, अतुल खिरोडकर, पवन काकडे यांच्यासह इतरांची स्वाक्षरी आहे.