खामगाव-जालना रेल्वेमार्गाला तात्काळ मंजुरी द्यावी; प्रतापराव जाधव यांची रेल्वेमंत्र्यांकडे आग्रही मागणी; दिल्लीतील भेटीत केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना दिले निवेदन..!
बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ, लोणारचे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर आणि शेगाव येथील संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ असल्यामुळे या भागाला देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. खामगाव-जालना रेल्वेमार्ग झाल्यास या सर्व ऐतिहासिक व धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. या रेल्वेमार्गासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि रेल्वे लोकआंदोलन समितीचे सदस्य सतत पाठपुरावा करीत आहेत. नागरिक या प्रकल्पाबाबत आस्थेने विचारपूस करतात आणि प्रलंबनाबाबत चिंता व्यक्त करतात. त्यामुळे हा मार्ग केवळ विकासापुरता मर्यादित नसून तो लोकभावनेशीही निगडित असल्याचे प्रतापराव जाधव यांनी आपल्या निवेदनात नमूद केले. या भेटीदरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनीही या मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असून, प्रकल्पास मंजुरी देण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याचे संकेत दिले आहेत.