“नव नगराची अधिसूचना काढा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या!”  संतप्त शेतकऱ्यांचा सरकारला इशारा. 

 
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :“नव नगराची अधिसूचना तात्काळ काढा, अन्यथा आम्हाला सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या” अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवनगर प्रकल्पाच्या अनिश्चिततेमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाले आहेत. या उद्विग्नतेचा शोकांत परिणाम म्हणजेच नवनगर बाधित शेतकरी कुटुंबातील बाळू उर्फ मच्छिंद्र एकनाथ कुहिरे (वय ३८) या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, “नव नगर प्रकल्पाची घोषणा होऊनही कामाचा एकही टप्पा सुरू झाला नाही. जमीन अधिग्रहण, पुनर्वसन आणि आर्थिक भरपाईबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून, बाळू कुहिरे यांच्यासारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.” “जर शासनाने तातडीने अधिसूचना काढून निधी मंजूर केला नाही, तर आम्हाला सामूहिक आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही.”असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राजेंद्र अंभोरे, लक्ष्मीकांत कठोरे, जगन चव्हाण, अरविंद खरात, देविदास भालेराव, संदीप मेहेत्रे, प्रवीण पवार, रोहिदास राठोड, गोपाळ चिंचोळकर, राम उदावंत, विष्णू मुंडलिक आणि शरद म्हस्के आदींची स्वाक्षरी आहे.