बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : उद्धव सेनेत बुलढाण्यात इनकमिंग सुरूच असून, २ ऑगस्ट रोजी शेतकरी क्रांती संघटनेने आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला आणि संघटना विलीन केली. यावेळी बोलताना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या एकूण शेतकरीविरोधी धोरणावर चौफेर टीका सुद्धा केली. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचं काम जोरदार सुरू आहे. जालिंदर बुधवत आणि संपूर्ण टीम चांगलं काम करते आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आंदोलन शिवसेनेने छेडले आहे. बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा देखील आपण काढला होता. कर्जमुक्ती मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री सध्या एकूणच हतबल झालेले आहेत. फडणवीस यांनी स्थापन केलेल्या नीतिमूल्य समितीचे पुढे काय झाले? आणि शेतकऱ्यांची थट्टा मस्करी करणारा कृषिमंत्री 'रमी' खेळण्यामुळे आता क्रीडामंत्री झाल्याची खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केली.
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष गजानन बिलेवार यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह २ ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आपली संघटना शिवसेनेत विलीन केली. यावेळी शिवसेनेचे नेते, संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, तालुकाप्रमुख श्रीराम खेलदार, युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हतबल मुख्यमंत्री असल्याची टीका केली. "मी एवढे हतबल मुख्यमंत्री पाहिले नाही. कुणी कुणाला जाबच विचारू शकत नाही. एखाद्या गोष्टीत एखाद्याला त्रास द्यायचा आणि त्यानंतर स्वतःच मध्यस्थी करून आपण तुमचे कसे कैवारी आहोत हे दाखवून द्यायचे, असा प्रकार सध्या सुरू आहे," असे ते म्हणाले. लाडक्या बहिणींमध्ये किती पापी घुसलेत?
"लाडक्या बहिणींमध्ये किती पापी घुसलेत? ते कुणी घुसवले? पैसे कुठे गेले? आजच बातमी आहे की लाडक्या बहिणींसाठी पैसे वळवण्यात आलेत. थोडक्यात हे सर्व काही ओढूनताणून सुरू आहे. आता बहिणींची सुद्धा आयकर विभागाकडून चौकशी होणार आहे. महिला पदाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. महायुतीने दाखवलेल्या स्वप्नाला काही लोक भुलले असतील, पण निवडणूक झाल्यानंतर आता त्यांचं खरं रूप समोर येत आहे. आपण कर्जमुक्तीचं आंदोलन सुरूच ठेवले पाहिजे," असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
रमी खेळणारा क्रीडामंत्री झाला...
उद्धव ठाकरे यांनी यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या कृषी खात्यावरून झालेल्या उचलबांगडीवरही भाष्य केले. "आज तर एक व्यंगचित्र आलं आहे. कदाचित आता रमी व तीनपत्तीला ऑलिम्पिकमध्ये मागणी होईल. आता रमी खेळणारा माणूस क्रीडामंत्री झाला आहे. अशा पद्धतीने हे सरकार सुरू आहे. आपल्याला या लोकांच्या भ्रष्टाचाराचा विद्रूप चेहरा लोकांपुढे न्यावा लागेल. याविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आपण राज्यात लवकरच हे आंदोलन छेडणार आहोत. तेव्हा सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे," असे ते म्हणाले.