शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सात हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी, आधार सिडिंगच नाही; पीएम किसानच्या २० व्या हप्त्यापासून मुकणार;  ई-केवायसी व आधार सीडिंग तातडीने पूर्ण करण्याचे कृषी विभागाचे आव्हान..!

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, जिल्ह्यातील अद्याप ३,०९९ शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि ४,४३३ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग प्रलंबित असल्यामुळे त्यांना लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी आणि आधार  सिडिंग प्रलंबित असेल त्यांनी  तातडीने करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करून, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे (आधार सीडिंग) आणि खाते DBT (थेट लाभ हस्तांतरण) सक्षम करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप बँक खाती नाहीत, त्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत खाते उघडून ते DBT सक्षम करावे, असे आवाहन उपसंचालक (कृषी) अनुराधा गावंडे यांनी केलं आहे.

दरवर्षी केंद्र व राज्य सरकारकडून मिळतात १२ हजार रुपये 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेत केंद्र सरकारमार्फत दरवर्षी ६,००० रुपये तर राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत अतिरिक्त ६,००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. मात्र, ई-केवायसी आणि आधार सीडिंग पूर्ण नसल्यास हा लाभ मिळणार नाही. 

तांत्रिक अडचणी आल्यास काय करावं?

शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी कार्यालय, कृषी सहाय्यक, किंवा गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ती प्रक्रिया मार्गी लावावी, असं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केलं आहे.