अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्या; ॲड. जयश्री शेळके यांची शासनाकडे मागणी...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, मोताळा तालुक्यातील रिधोरा, गुगळी, लपाली, सिंदखेड, पिंपळगावदेवी, लिहा, आव्हा आणि कोल्ही गवळी या गावांमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्रीताई शेळके यांनी ५ नोव्हेंबर रोजी या गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
पाहणीदरम्यान बोलताना ॲड. शेळके म्हणाल्या की, “अतिवृष्टीमुळे मक्याला कोंब आले असून कपाशीची बोंड सडली आहेत. अनेक ठिकाणी पेरण्या वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली आहे. शासनाने पंचनाम्याचा फार्स न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, पिक विमा कंपन्यांनी कापणीनंतरच्या पिक नुकसानीचे दावे तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही त्या म्हणाल्या.

सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून, वीजपुरवठ्यातील अडथळे, खत-बियाण्यांचे वाढते दर आणि विमा दावे प्रलंबित राहिल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. मागील हंगामातील नुकसानभरपाई व कर्जमाफीची प्रतीक्षा अजूनही सुरू असल्याने त्यांची अडचण अधिक वाढली आहे.

“शासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विमा दावे मंजुरी आणि कर्जमाफी जाहीर करून दिलासा द्यावा,” अशी ठाम मागणी ॲड. जयश्री शेळके यांनी केली. त्यांनी पुढे म्हटले की, “शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटाच्या काळात शासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.”

यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, तालुकाप्रमुख विजय इंगळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रवीण कदम, उपतालुकाप्रमुख मुकुंदा माळी, युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे, तालुका प्रमुख मोहित राजपूत, रामशंकर सोनोने, योगेश महाजन, अक्षय जवरे, ज्ञानेश्वर कोळसे तसेच गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.