गणेशोत्सवात महाप्रसाद वाटणार असाल तर हे नियम पाळावेच लागणार; अन्न सुरक्षा विभागाच्या गणेश मंडळांना महत्त्वाच्या सूचना...
महाप्रसाद आणि भंडारा आयोजित करण्यापूर्वी गणेश मंडळांनी Complaints.mahafda.in या पोर्टलवरील ‘उत्सव परवानगी अर्ज’ या सदरातून अर्ज करणे आवश्यक आहे. मंडळाकडून स्वतः अन्न तयार केले जाणार असल्यास FSSAI पोर्टलवर नोंदणी करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे.
महाप्रसादासाठी लागणारे तेल, तूप, रवा, मैदा, साखर, मसाले, भाज्या, ड्रायफ्रूट्स यांसह सर्व कच्चा माल अधिकृत ठिकाणाहून खरेदी करावा. खरेदीची बिले जतन करून ठेवावीत. तसेच अन्नपदार्थ खरेदी करताना पॅकेटवरील उत्पादक तारीख, वापरण्याची अंतिम तारीख, उत्पादकाचा पत्ता, घटकांची माहिती आणि FSSAI परवाना किंवा नोंदणी क्रमांक तपासणे आवश्यक आहे.स्वयंपाकासाठी कॅटरर्सची नियुक्ती केली असल्यास संबंधित कॅटरर्सकडे वैध अन्न परवाना असल्याची खात्री करून घ्यावी. केवळ परवानाधारक कॅटरर्सकडूनच महाप्रसाद तयार करून घ्यावा. महाप्रसाद तयार करणाऱ्या कॅटरर्सच्या कामगारांची वैद्यकीय तपासणी झालेली असून त्यांचे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र उपलब्ध आहे की नाही, याचीही खात्री मंडळांनी करावी.
महाप्रसाद तयार करण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित जागेची निवड करावी. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ व निर्जंतुक केलेली असावीत. अन्न तयार करण्यासाठी सुरक्षित पिण्याच्या पाण्याचाच वापर करावा. बोअरवेलचे पाणी वापरणार असल्यास त्याची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ताजे आणून त्यांचा शक्य तितक्या लवकर वापर करावा. तयार केलेले प्रसादाचे अन्नपदार्थ 12 तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ साठवून ठेवू नयेत, अशीही सूचना करण्यात आली आहे.
महाप्रसाद तयार करताना परवानगी नसलेल्या खाद्यरंगांचा वापर करू नये. अखाद्य घटक किंवा औद्योगिक रसायनांचा वापर करणे टाळावे. खाद्यतेलाचा वारंवार पुनर्वापर करू नये. वापरलेल्या तेलामध्ये ‘टोटल पोलार कंपाऊंड’चे प्रमाण 25 पेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गौरी-गणेश उत्सव भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करताना भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे महाप्रसाद किंवा भंडाऱ्याचे आयोजन करणाऱ्या सर्व गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.