“मला मोठेपणी कलेक्टर व्हायचंय!” चिमुकल्याचं स्वप्न ऐकताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला स्वतःच्या खुर्चीत बसवलं! डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या संवेदनशीलतेने जिंकली मने; आठ बालकांना मिळणार मायेचं छत्र...

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्रत्येक बालकाच्या आयुष्यात आई-वडिलांची माया, कुटुंबाचा आधार आणि सुरक्षित भविष्य असावं, हीच अपेक्षा असते. मात्र, काही चिमुकल्यांच्या वाट्याला आयुष्याच्या सुरुवातीलाच संघर्ष येतो. अशा बालकांना हक्काचं कुटुंब मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी घेतलेला पुढाकार सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. जिल्ह्यातील दत्तकविधान प्रक्रियेतील आठ प्रलंबित प्रकरणांना गती देत या चिमुकल्यांच्या कौटुंबिक पुनर्वसनाचा मार्ग सुकर करण्यात आला आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान घडलेल्या एका हृदयस्पर्शी प्रसंगाने उपस्थितांची मने जिंकली. जिल्हाधिकाऱ्यांनी एका चिमुकल्याला सहज विचारलं, "बाळा, तुला मोठेपणी काय व्हायचंय?" क्षणाचाही विलंब न करता चिमुकला आत्मविश्वासाने उत्तरला, "मला कलेक्टर व्हायचंय!" हे उत्तर ऐकताच जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी त्या चिमुकल्याला थेट स्वतःच्या खुर्चीत बसवलं. ज्या खुर्चीवर बसण्याचं स्वप्न त्या बालकाच्या डोळ्यांत होतं, त्याच खुर्चीवर बसण्याचा आनंद त्याला अनुभवता आला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मनापासून शुभेच्छा देत मोठी स्वप्नं पाहण्याचं आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याचं प्रोत्साहन दिलं. एका निरागस स्वप्नाला मिळालेला हा सन्मान केवळ त्या बालकासाठीच नव्हे, तर उपस्थित प्रत्येकासाठी भावनिक क्षण ठरला.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी दत्तकविधान प्रक्रियेतील प्रलंबित प्रकरणांचा विशेष आढावा घेत संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आठ प्रकरणांमध्ये संबंधित पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये संस्थांतर्गत दत्तकविधानाची दोन, सावत्र दत्तकविधानाची दोन आणि नातेवाईकांमार्फत दत्तकविधानाची चार प्रकरणे समाविष्ट आहेत. या सर्व प्रकरणांतील आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, आठ बालकांना सुरक्षित आणि प्रेमळ कौटुंबिक वातावरण मिळण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. दत्तकविधान ही केवळ कागदोपत्री किंवा कायदेशीर प्रक्रिया नसते, तर एका बालकाच्या आयुष्याला मायेचा आधार देणारा, त्याच्या भविष्याला नवी दिशा देणारा प्रवास असतो. प्रत्येक बालकाला प्रेम, सुरक्षितता, शिक्षण आणि स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाचा हा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरत आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे, संरक्षण अधिकारी सागर राऊत तसेच दत्तकविधान संस्थेचे (दि लव्ह ट्रस्ट) संस्थापक गजानन कुलकर्णी यांनी समन्वयातून कार्यवाही केली. प्रशासकीय खुर्चीवर बसून निर्णय घेणारे अधिकारी अनेक असतात; मात्र त्या खुर्चीत एका चिमुकल्याला बसवून त्याच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीने माणुसकीचा एक सुंदर संदेश दिला आहे!