हॅलो हॅलो चा प्रॉब्लेम सुटणार!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश! जिल्ह्यात नवे ४२ बी.एस.एन.एल. टॉवर सेवेत कार्यान्वित....

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ग्रामीण भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवेची कमतरता दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून बुलडाणा जिल्ह्यात नव्याने उभारण्यात आलेल्या 44 टॉवरपैकी 42 टॉवरवरून बी.एस.एन.एल.ची सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण ग्राहकांना दर्जेदार नेटवर्क उपलब्ध होऊन संवाद व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातून वारंवार बी.एस.एन.एल. सेवेबाबत तक्रारी येत होत्या. यासंदर्भात खासदार प्रतापराव जाधव यांनी दूरसंचार विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार करून नवीन टॉवर उभारणीची मागणी केली होती. त्यानुसार विभागाने प्रस्ताव मंजूर करून जिल्ह्यात टॉवर उभारणीसाठी परवानगी दिली. जाधव यांच्या कार्यालयाकडून झालेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अल्पावधीतच टॉवरचे काम पूर्ण होऊन सेवा कार्यान्वित करण्यात आली.

या नव्या टॉवरमुळे बुलडाणा, चिखली, मेहकर, मोताळा, लोणार, सिंदखेड राजा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर व नांदुरा तालुक्यांतील शेकडो गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे बी.एस.एन.एल.ची मोबाईल व इंटरनेट सेवा ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणार असून डिजिटल सेवांचा लाभ नागरिकांना होणार आहे...


दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आभार...

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा जिल्ह्यासाठी 44 नवीन टॉवर मंजूर करून त्यातील 42 टॉवर तत्काळ कार्यान्वित करून दिल्याबद्दल केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.