सिंदखेड राजा, चिखली तालुक्यातील ४४ गावांना अतिवृष्टीचा तडाखा; १० हजार हेक्टरवरील पिके गेली पाण्यात; चिखली तालुक्यातील ३१ गावांना फटका..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात ९ आणि १० ऑगस्ट राेजी झालेल्या अतिवृष्टीचा चिखली आणि सिंदखेड राजा तालुक्यातील ४४ गावांना तडाखा बसला आहे. साखरखेर्डा आणि पांढरदेव परिसरात ढगफुटीसदृश्य पाउस झाल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाने केलल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार चिखली तालुक्यातील ३१ आणि सिंदखेड राजा तालुक्यातील १३ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. 
जिल्ह्यातील काही भागात ९ आणि १० ऑगस्ट राेजी अतिवृष्टी झाली हाेती. सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा आणि चिखली तालुक्यातील पांढरदेव परिसरात तर ढगफुटीसदृश्य पावसाची नाेंद झाली हाेती. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. नदीकाठावरील आणि नाल्यांच्या काठावरील पिके वाहून गेली हाेती.  प्राथमिक सर्वेक्षणानुसार, जिल्ह्यात तब्बल १०,२५२ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. यामध्ये सिंदखेडराजा तालुक्याचे ७,४८८ हेक्टर आणि चिखली तालुक्याचे २,७६४ हेक्टर क्षेत्र आहे.


सिंदखेडराजा तालुक्यातील १३ गावांना आणि चिखली तालुक्यातील ३१ गावांना निसर्गाच्या तडाख्याचा सर्वाधिक फटका बसला. विशेषतः साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा मंडळांत सोयाबीन, कपाशी आणि तुरीची मोठ्या प्रमाणात हानी झाली. किनगाव राजा महसूल मंडळातही १० ऑगस्टच्या पावसाने नुकसान केले असले, तरी पर्जन्यमान नोंदवणारी अधिकृत यंत्रणा पाऊस झालेल्या भागात नसल्याने हा आकडा अहवालात दिसलेला नाही. त्यामुळे अंतिम आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता महसूल प्रशासनाने वर्तविली आहे.