हरकतींवर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी पूर्ण; जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये किरकाेळ बदल हाेणार; अंतिम आराखडा २२ ऑगस्टला निश्चित हाेण्याची शक्यता; राजकीय पक्षांसह इच्छुक लागले कामाला!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्रशासक राज असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग माेकळा झाला आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या ६१ गट आणि पंचायत समितीच्या १२२ गणांचा प्रारुप आराखडा जाहीर करण्यात आला हाेता. त्यावर ४९ हरकती आल्या हाेत्या. त्यावर सुनावणी पूर्ण झाली असून काही गटांमध्ये किरकाेळ बदल करून  अंतिम हाेणार आहेत. येत्या २२ ऑगस्टपर्यंत प्रारुप आराखड अंतिम हाेणार असून त्यानंतर आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांसह इच्छुकांनी जाेरदार तयारी सुरू केल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. 
बुलढाणा जिल्हा परिषदेसाठी ६१ गट आणि पंचायत समित्यांच्या १२२ गणांचा प्रारुप आराखडा जाहीर करण्यात आला हाेता. या प्रारुप आराखड्यावर जिल्हाभरातून ४९ हरकती आल्या हाेत्या. या हरकतीवर विभागीय आयुक्तांनी सुनावणी पूर्ण केली आहे. या आक्षेपांनुसार काही किरकोळ बदल होत असून, सुधारीत आराखडा १८ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्तांच्या कोर्टात पुन्हा अवलोकनासाठी जाणार आहे. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी गट-गणांचा आराखडा अंतिम हाेण्याची शक्यता आहे. 

एक गट आणि दाेन गण वाढले 
बुलढाणा जिल्हा परिषदेत गतवेळेपेक्षा एक गट व दोन गणांची वाढ झाली असून, आता गटांची संख्या ६१ तर गण १२२ झाली आहे. या बदलामुळे अनेक राजकारण्यांचे गणित बदलले असून, याच कारणास्तव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर आक्षेप दाखल झाले होते. मात्र उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, प्रारूप आराखड्यात मोठे बदल होण्याची शक्यता नाही.त्यामुळे, अंतिम आराखडा जाहीर  झाल्यानंतर अनेकांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मुंबईत तर पंचायत समितीच्या सभापतींचे जिल्ह्यातच निघणार आरक्षण जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसले तरी त्याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. ग्रामविकास विभागाने लोकसंख्येचा ताजा डेटा मागवला आहे.जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत मुंबईत होणार असून, पंचायत समिती सभापतींसाठीची सोडत जिल्ह्यातच होईल. या आरक्षण साेडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.