पालकमंत्र्यांचा अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा; तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा, मेहकर आणि इतर तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतपिके, घरे, जनावरे, विहिरी आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

पालकमंत्री पाटील यांनी आज अतिवृष्टीग्रस्त गावांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या सोबत आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, तहसीलदार भूषण पाटील तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी लोणार तालुक्यातील देऊळगाव कुडपाळ, सिंदखेडराजा तालुक्यातील बिंबिखेळ, आणि मेहकर तालुक्यातील वडगाव तेजन व डोणगाव या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त भागाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी त्यांनी तात्काळ पंचनामे करून स्थानिक स्तरावर मदत देण्याचे व शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकार गांभीर्याने पाहत आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पात्र शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. सर्व पंचनामे तातडीने पूर्ण करा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळेल याची दक्षता घ्या.”दरम्यान, पालकमंत्र्यांनी लोणार सरोवराचीही पाहणी करून पर्यटकांसाठी सुविधा वाढवण्यासंबंधी सूचना दिल्या. पर्यटन विकासासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाला दिले.