शाळकरी मुली आणि दिव्यांग महिलांसाठी अनुदान योजना — ५ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू! बुलडाणा जिल्हा परिषदेची खास योजना; असा करा अर्ज....

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील शाळकरी मुली व दिव्यांग महिलांसाठी जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाने उपयुक्त अशी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शाळकरी मुलींना लेडीज सायकल तर दिव्यांग महिलांना पिठाची चक्की खरेदीसाठी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
या योजनेनुसार सन 2024-25 या वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गातील 7 वी ते 12 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींना लेडीज सायकल खरेदीसाठी अनुदान देण्यात येईल. त्याचबरोबर सन 2025-26 मध्ये जिल्हा परिषद सेस अंतर्गत दिव्यांग महिला व मुलींना पिठाची चक्की खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.

दोन्ही योजनांसाठी पात्र लाभार्थींनी आपल्या तालुक्याच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातून अर्ज नमुना प्राप्त करून, आवश्यक कागदपत्रांसह तो पूर्ण भरून सादर करणे अपेक्षित आहे. अर्ज नमुने व अटी-शर्ती संबंधित प्रकल्प कार्यालयात तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर zpbuldhana.maharashtra.gov.in या ठिकाणी उपलब्ध आहेत.

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 5 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर 2025 आहे. बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर, मोताळा, नांदुरा, मलकापूर, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांतील लाभार्थींनी संबंधित प्रकल्प कार्यालयात आपले अर्ज वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.