रूपाली व रियांश म्हस्के यांना न्याय द्या! मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; मेहकर पोलीस ठाण्यात नातलगांचा आक्रोश...
रविवारी मध्यरात्री आरोपी राहुल म्हस्के याने पत्नी रूपाली म्हस्के व चार वर्षांचा मुलगा रियांश म्हस्के यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मृतक रूपाली यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यात यावा, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच तपासादरम्यान अन्य सहआरोपी निष्पन्न झाल्यास त्यांनाही कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी ठाम मागणी नातेवाईकांनी यावेळी केली. पोलीस ठाण्यात नातलगांनी भावना व्यक्त करत संताप व्यक्त केला.
मोळा येथील ग्रामस्थांनी नातेवाईकांची समजूत काढत पोलीस प्रशासन व नातेवाईक यांच्यात संवाद घडवून आणला. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल्यानंतर नातेवाईक शांततेत पोलीस ठाण्यातून परतले.
“या प्रकरणाचा तपास प्रथम प्राधान्याने सुरू आहे. तपासाअंती जे दोषी असतील, त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तपासामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर ठेवली जाणार नाही.”
— व्यंकटेश्वर आलेवार, ठाणेदार, मेहकर