ओपन स्पेस मध्ये गैरव्यवहार? आमदार संजय गायकवाडांनी सभागृहात ठेवले मुद्द्यावर बोट! म्हणाले, चुकीच्या कृत्यांना कायदेशीर आवरण देऊ नका..

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ९ डिसेंबर रोजी बुलडाण्यातील नगरपरिषदांमधील धक्कादायक गैरव्यवहारांचा मुद्दा आमदार संजय गायकवाड यांनी जोरदारपणे उपस्थित केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधेयकावरील चर्चेदरम्यान गायकवाड यांनी थेट सभागृहात प्रश्नांचा भडीमार करत चुकीच्या कृत्यांना कोणतेही कायदेशीर आवरण देऊ नये, अशी ठाम मागणी केली.
गायकवाड म्हणाले की, पूर्वी लेआउटमधील निश्‍चित ‘ओपन स्पेस’चे प्रतीकात्मक एका रुपयाच्या करारावरून नगरपालिका ताबा घेत असे. पण अनेक ठिकाणी हे हस्तांतरण न झाल्याने त्या जागा आजही मूळ मालकांच्या नावावरच आहेत. पुढे याच जमिनींवर नव्याने लेआउट टाकून प्लॉट विक्री झाली. काही नगरपालिकांनी तर गुंठेवारी कायदा वापरून ‘ओपन स्पेस’च गुंठेवारीत ढकलला आणि काही ठिकाणी कमर्शियल परवानग्याही दिल्या. “गैरव्यवहार खुलेआम झाले आणि आता यांना कायदेशीर संरक्षण मिळणार का?” असा थेट सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.

भास्करराव जाधव यांनी उल्लेख केलेल्या सेक्शन ३७चा दाखला देत गायकवाड म्हणाले की, प्ले-ग्राउंड आणि शाळांच्या आरक्षित जागांवर राज्य शासनाचा स्पष्ट अधिकार आहे. या आरक्षणांना हात न लावणे हीच शासनाची नैतिक जबाबदारी आहे. तरी काही शहरांत मुख्याधिकाऱ्यांनी प्ले-ग्राउंडवरच एन.ए. मंजूर करून थेट घरबांधणीला परवानगी दिली आहे. अनेक ठिकाणी कामे प्रत्यक्ष सुरूही झाली आहेत.

“या प्रकारांना नवीन कायद्याचा आधार मिळणार? गैरव्यवहारांना मान्यता देण्याचा मार्ग तयार होणार?” असा तीव्र सवाल करत गायकवाड यांनी महसूल मंत्र्यांकडे स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी केली.सभागृहात गायकवाड यांची ही आक्रमक मांडणी विशेषतः चर्चेचा विषय ठरली.