जनगणना २०२७ साठी बुलढाणा जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला! प्रत्येक नागरिकाला विचारले जाणार ४० प्रश्न; घरोघरी जाऊन माहितीची पडताळणी होणार...

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देशभरात होणाऱ्या जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे उपस्थित होते. जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रगणक, पर्यवेक्षक आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यावर या प्रशिक्षणात विशेष भर देण्यात येत आहे.

जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वतयारीत घरयादी तयार करणे आणि गणना गट निश्चित करण्याच्या कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक प्रवीण भगत आणि सांख्यिकी अन्वेषक वर्ग-२ निहाल धरंधरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनगणनेची कार्यपद्धती, जबाबदाऱ्या आणि संभाव्य अडचणींवरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, जनगणनेदरम्यान नागरिकांकडून ४० प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार असल्याचे प्रशिक्षणात सांगण्यात आले. यामध्ये नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीशी संबंधित माहितीचा समावेश असेल. नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यानंतर प्रगणक घरोघरी भेट देऊन संकलित माहितीची पडताळणी करणार आहेत. या व्यापक प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि जनगणनेशी संबंधित अधिकारी प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी जनगणना कक्षाच्या संजीवनी मुंपडे, तहसीलदार (सामान्य प्रशासन) पी. के. करे, नायब तहसीलदार तसेच सहायक महसूल अधिकारी अपेक्षा जाधव यांनी सहकार्य केले. जनगणनेच्या प्रत्यक्ष कामकाजात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येत आहे.