पाच तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला; प्रशासनाने केले ‘नियंत्रित क्षेत्र’घोषित; गुरे, म्हशी वाहतूक व बाजारांवर मनाई; प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील देऊळगाव राजा, मलकापूर, सिंदखेड राजा, खामगाव व चिखली तालुक्यातील काही गावांमध्ये लम्पी त्वचा आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे पुणे येथील पशुसंवर्धन रोग व अन्वेषण सहआयुक्त कार्यालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार या गावांना ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले असून, गुरांचे बाजार, वाहतूक व संबंधित कार्यक्रमांवर मनाई आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केला आहे.
नियंत्रित क्षेत्र घाेषित केलेल्या गावांमध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण, सिंनगाव जहागीर, पांगरी, अंढेरा, मलकापूर तालुक्यातील मलकापूर शहर, सिंदखेड राजा तालुका : दरेगाव, साखरखेर्डा, उमणगाव, पांग्री काटे, खामगाव तालुका : शिर्ला आणि चिखली तालुक्यातील केळवद गावाचा समावेश आहे. नियंत्रित क्षेत्रातून गुरे, म्हशी प्रजातीचे प्राणी अन्यत्र किंवा बाहेर नेणे-आणणे बंद करण्यात आले आहे. बाधित प्राण्यांच्या संपर्कात आलेले वैरण, साहित्य, कातडी किंवा अन्य उत्पादने बाहेर नेण्यासही मनाई आहे. चिखली तालुक्यातील केळवद येथे लम्पी प्रादुर्भावाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटर परिसर बाधित व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रात गुरांचे बाजार, शर्यती, जत्रा, प्रदर्शन यांनाही बंदी आहे.