मुदतबाह्य नसलेली औषधे जाळल्याचा प्रकार भोवला; तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस;
चौकशीत मुदत न संपलेल्या औषधांचीही विल्हेवाट लावण्यात आल्याचे सिद्ध झाल्याने संबंधित औषध निर्माण अधिकाऱ्याकडून त्या औषधांची किंमत वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र वसाली येथे मुदतबाह्य नसलेली औषधे जाळण्यात आल्याचा तसेच वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचा आरोप करणारी बातमी प्रसारित झाल्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात आली.
या चौकशीत असे निदर्शनास आले की, प्राथमिक आरोग्य केंद्र वसाली मार्च २०२४ पासून कार्यरत आहे. मंजूर १५ पदांपैकी २ वैद्यकीय अधिकारी कंत्राटी स्वरूपात कार्यरत असून ८ पदे बाह्य स्रोताद्वारे भरलेली आहेत. काही पदे अद्याप रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी सोनाळा येथे वास्तव्यास असून वसाली येथे निवासाची सुविधा उपलब्ध नाही. ई-औषधी लॉगिन उपलब्ध नसल्याने औषध पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा येथून ऑफलाइन पद्धतीने केला जात आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ५,४१७ बाह्यरुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत.
चौकशीदरम्यान Calcium गोळ्या, Dexamethasone, Pheniramine, Gentamycin इंजेक्शन तसेच Metronidazole सिरप ही औषधे जाळण्यात आल्याचे आढळून आले. या औषधांची एकूण किंमत २ हजार ५३२ रुपये असून त्यापैकी केवळ १६० रुपये किमतीची औषधे मुदतबाह्य होती. उर्वरित औषधांच्या विल्हेवाटीप्रकरणी संबंधित औषध निर्माण अधिकाऱ्याकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून प्राप्त खुलाशांच्या आधारे पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. भविष्यात अशा प्रकारची चूक आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तालुकास्तरावरील नियंत्रणाबाबत वरिष्ठ स्तरावर आवश्यक ती कारवाई प्रस्तावित असून औषध विल्हेवाट प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी स्पष्ट केले.