बुलढाण्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; जिल्ह्यात १८ लाख ९९ हजार मतदार, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकतींची संधी

 
बुलढाणा ( जिमाका:बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा):भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत जिल्ह्यात एकूण १८ लाख ९९ हजार ०२८ मतदार आहेत. मतदारांना प्रारूप यादीत आपले नाव तपासता येणार असून, नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता अथवा अन्य तपशिलात त्रुटी असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादीत ९ लाख ९१ हजार ४१३ पुरुष, ९ लाख ०७ हजार ५८८ महिला आणि २७ इतर मतदारांचा समावेश आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्या अशी आहे. मलकापूर मतदारसंघात २ लाख ५८ हजार ४०७, बुलढाणा २ लाख ४९ हजार ०६४, चिखली २ लाख ६७ हजार ३२६, सिंदखेडराजा २ लाख ९१ हजार २४६, मेहकर २ लाख ८२ हजार ४७१, खामगाव २ लाख ७५ हजार ५३५ आणि जळगाव जामोद मतदारसंघात २ लाख ७४ हजार ९७९ मतदार आहेत.


SIR प्रक्रियेत मतदान केंद्रांचेही सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर जिल्ह्यात एकूण २३०१ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मलकापूरमध्ये ७, बुलढाण्यात १, सिंदखेडराजात २, खामगावमध्ये २ आणि जळगाव जामोदमध्ये २ अशी एकूण १४ नवीन मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. याशिवाय काही मतदान केंद्रांचे विभाजन, विलीनीकरण तसेच नाव आणि ठिकाणात बदल करण्यात आले आहेत.

प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नावातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी संबंधित मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.SIR च्या सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती स्वीकारण्यात येतील. त्यानंतर ३१ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबरदरम्यान दावे-हरकतींच्या निकालाची प्रक्रिया होणार असून, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदारांना SIR प्रक्रियेबाबत माहिती मिळावी यासाठी जिल्हास्तरावर मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. तसेच ECINET App वर ‘Book a Call with BLO’ सुविधेद्वारे संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशी संपर्क साधता येणार आहे.जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासावे. नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता अथवा अन्य तपशिलात त्रुटी असल्यास विहित कालावधीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.