पालकमंत्री, सहपालकमंत्र्यांच्या उपस्थितीत २५ सप्टेंबरला डीपीसी बैठक; विविध विषयावर हाेणार चर्चा; सर्व विभाग प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश ..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत प्रथमच पालकमंत्र्यासोबत सहपालकमंत्री उपस्थित राहणार असल्याने जिल्ह्याचे राजकारण आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहात ही बैठक पार पडणार आहे.
पालकमंत्री ना. मकरंद जाधव (पाटील) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत १६ मे रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालन, २०२५-२६ च्या वार्षिक योजनेतील सर्वसाधारण व घटक कार्यक्रमांचा आढावा, तसेच १७ सप्टेंबर अखरेच्या प्रगती अहवालाचे परीक्षण होणार आहे. याशिवाय ऐनवेळी आलेले महत्वाचे विषयही चर्चेत घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व विभागप्रमुखांना आवश्यक माहितीसह अनिवार्य उपस्थितीचे निर्देश दिले आहेत.

 जिल्ह्याच्या सहपालकमंत्रिपदी नियुक्तीनंतर संजय सावकारे यांनी नुकतीच प्रशासनाची आढावा बैठक घेतली होती. मात्र, नियोजन समितीच्या अधिकृत बैठकीत ते प्रथमच सहभागी होत असल्याने त्यांची भूमिका काय असणार, कोणते मुद्दे ते मांडणार आणि जिल्ह्याच्या विकासाबाबत ते किती आक्रमक राहतात, याकडे राजकीय वर्तुळासोबतच जनतेचे लक्ष लागले आहे.