थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना ‘डबल पॉवर’; सदस्यत्व व मतदानाचा अधिकार देणारा अध्यादेश; महायुती सरकारचा मोठा निर्णय; नगरराजकारणात समीकरणे बदलणार...
थेट अध्यक्षालाही सदस्यत्वाचा हक्क
नवीन सुधारणेनुसार थेट जनतेतून निवडून आलेल्या अध्यक्षालाही सदस्य म्हणून मान्यता दिली जाणार आहे. म्हणजेच, अध्यक्ष म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती आणि सदस्य म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती एकाच वेळी दोन्ही पदे धारण करू शकणार आहे. या निर्णयामुळे थेट अध्यक्षालाही जनादेश प्राप्त असल्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे.
मतदानातही अधिकार; बरोबरीत निर्णायक मत
या सुधारणेनंतर थेट निवडून आलेल्या अध्यक्षाला सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार मिळणार आहे. अध्यक्ष किंवा सदस्य या कोणत्याही नात्याने एकच मत देता येणार असून, मतांची बरोबरी झाल्यास अध्यक्षाला निर्णायक मत (कास्टिंग वोट) देण्याचा अधिकार कायम राहणार आहे.
नगरराजकारणात हालचालींना वेग
महायुती सरकारच्या या निर्णयामुळे नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सत्तासंघर्ष, बहुमताचे गणित आणि विरोधकांच्या राजकीय डावपेचांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः अल्पमतातील नगराध्यक्षांना बळकटी मिळणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकारण अधिक धारदार होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या कायद्यातील सुधारणेसाठी लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असून, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात नवे राजकीय समीकरण उभे राहण्याची चिन्हे आहेत.