दुष्काळ संपेपर्यंत शेतकऱ्यांच्या दारात फिरकू नका, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ! आमदार संजय गायकवाडांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना उघड इशारा; महिला बचत गटांची कर्जवसुली थांबविण्याचीही मागणी

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट ओढवले असून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील महिला आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची कर्जवसुली केली जात असल्याचा आरोप करत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुष्काळाचे संकट संपेपर्यंत मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या दारात फिरकू नये, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा उघड इशारा त्यांनी आज, २८ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरण, सामूहिक विवाह सोहळा आणि आरोग्य मेळाव्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशातच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा छळ केला जात आहे. आपल्या मतदारसंघातही शेतकऱ्यांना मिळालेली पाच हजार रुपयांची दुष्काळी मदत तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमधून मिळणारे पैसे वसुलीच्या नावाखाली काढून घेण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. काही कंपन्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना वसुलीसाठी नियुक्त केले आहे. शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांच्या पत्नी व मुलांना अपमानास्पद बोलले जाते. बेरोजगार तरुणांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडूनही अशी कामे करून घेतली जात असल्याचे ते म्हणाले.

दुष्काळाचे संकट दूर होईपर्यंत शेतकऱ्यांच्या दारात मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी गेल्यास शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मी स्वतः शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असे आव्हान गायकवाड यांनी दिले. दुष्काळामुळे शेतीत काम उरलेले नाही. ग्रामीण भागातील शेतमजूर महिलांचा रोजगार बुडाला आहे. अनेक महिला बचत गटांनी बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे. उत्पन्नाचे साधनच नसल्याने या महिलांना कर्जाचे हप्ते भरणे शक्य होत नाही. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत महिला बचत गटांची कर्जवसुली थांबवावी आणि थकीत रकमेवर व्याजही आकारू नये, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि राज्य मंत्रिमंडळाकडे केली.

उद्या, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता मोताळा तालुक्यात भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध आजारांची तपासणी व निदान करण्यात येणार असून, गरजेनुसार राज्यातील रुग्णालयांमध्ये उपचार आणि शस्त्रक्रियांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, आपल्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करून त्यावरील खर्च शेतकरी, शेतमजूर आणि विधवा शेतकरी महिलांच्या मुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी करण्याचा निर्णय आमदार गायकवाड यांनी जाहीर केला. येत्या २९ मे रोजी बुलढाण्यात हा भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन यांसह सर्व धर्मीयांना या सोहळ्यात सहभागी होता येणार असून, विवाहांच्या संख्येवर कोणतेही बंधन राहणार नाही. शासनाच्या मदतीव्यतिरिक्त वधूंना मंगळसूत्र, साड्या आणि अन्य आवश्यक साहित्य देण्यात येणार आहे. जवळपास ५० हजार नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचे नियोजन असून, ३० एप्रिलपर्यंत विवाहासाठी नोंदणी केली जाणार आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी धर्मवीर फाउंडेशन आणि ‘घे भरारी’ संस्थेच्या माध्यमातून बुलढाण्यातील जिजामाता क्रीडा संकुलात चार दिवसीय महिला उद्योजकता प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येणार आहे. महिलांनी स्वतः तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्टॉल उभारण्यात येणार आहेत. आगामी काळात १५ ते २० हजार महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.