न्यायालय आवारात श्वानांचा उपद्रव; पक्षकाराच्या मुलास चावा; वकील संघाची न्यायाधीशांकडे धाव; न्यायालयाचे पालिकेला बंदोबस्ताचे आदेश...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा येथील न्यायालयाच्या आवारात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढल्याने वकील, पक्षकार व नागरिक त्रस्त झाले आहेत. १२ डिसेंबर रोजी एका पक्षकार महिलेच्या अल्पवयीन मुलास कुत्र्याने चावा घेतल्याची गंभीर घटना घडली. या घटनेची दखल घेत जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे लेखी विनंती करत भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. यानंतर न्यायालय प्रशासनानेही ही बाब गांभीर्याने घेत प्रबंधकांमार्फत बुलढाणा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत आवश्यक कारवाईच्या सूचना केल्या आहेत.

न्यायालय परिसरात मोकाट कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताबाबत आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात अद्याप प्रभावी उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. गल्लीबोळांसह प्रशासकीय कार्यालयांच्या परिसरातही भटक्या कुत्र्यांच्या झुंडी मुक्त संचार करत असून न्यायालयाचा परिसरही याला अपवाद राहिलेला नाही.

सध्या न्यायालयाची नवीन सुसज्ज इमारत उभारणीच्या टप्प्यात असून बांधकाम प्रगतीपथावर आहे. टंकलेखन हॉलसह वकिलांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या टिनशेड परिसरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. या श्वानांकडून जागोजागी घाण केली जात असल्याने दुर्गंधी पसरत असून वकील व पक्षकारांना बसणे व वावरणे अवघड झाले असल्याचे वकिलांनी सांगितले.

कुत्र्यांची दहशत; भीतीचे वातावरण

१२ डिसेंबर रोजी एका श्वानाने न्यायालयात आलेल्या पक्षकार महिलेच्या मुलावर हल्ला करत चावा घेतला. उपस्थित नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप करत त्या मुलाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. या घटनेनंतर न्यायालयात येणाऱ्या वकील, पक्षकार तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्वान चावल्यानंतर उद्भवणारे गंभीर आजार व उपचारांचा खर्च पाहता ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा वकील संघाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे दिलेल्या विनंती पत्रात न्यायालयाच्या आवारातील भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालय प्रशासनाने १७ डिसेंबर रोजी प्रबंधकांमार्फत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत न्यायालय परिसरातील मोकाट श्वान पकडून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

विधिज्ञांमध्ये निर्माण झालेला रोष लक्षात घेता पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.