जिल्हा परिषदेचे सीईओ स्वतःला सुपर पॉवर समजता काय? आरोग्य विभागातील १४ जणांचे मनमानी निलंबन; अधिकारांचा केला दुरुपयोग... कसा ते बातमीत वाचा...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी १२ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिल्या. त्यानंतर २० ऑगस्टला सीईओ खरात यांनी देऊळगाव माळी येथील वैद्यकीय अधिकारी विशाल सुरुशे आणि बोराखेडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक थिगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र वैद्यकीय अधिकारी हे राजपत्रित अधिकारी असल्याने त्यांच्या निलंबनाचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नसल्याचा शासन निर्णय आहे. मात्र शासनाच्या निर्णयांना डावलून स्वतःचेच अधिकार श्रेष्ठ असल्याचा आव मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांच्याकडून आणल्या जात आहे.
काय व्हायला हवं होतं?
शासनाच्या मार्गदर्शक नियमानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या काही तक्रारी आढळून आल्यास त्या तक्रारीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राथमिक चौकशी करावी.. त्या चौकशीत तथ्य आढळून आल्यास आपल्या अभिप्रायासह प्रस्ताव त्वरित शासनास सादर करावा. तक्रार गंभीर स्वरूपाची असल्यास आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना कर्तव्यापासून दूर ठेवणे गरजेचे असल्यास शासनाकडून योग्य ती कार्यवाही होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदस्थापना ठेवण्यात यावी, पुढील पद स्थापनेबाबत सात दिवसात शासनाकडून आदेश घ्यावेत असे नियम आहेत..मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी स्वतःच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन करून नियमाची पायमल्ली केली आहे..
बोराखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात नंबर एक, तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे केले निलंबन...
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोराखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक थिगळे यांचे निलंबन केले आहे. वास्तवात स्वतः जिल्हा परिषदेकडूनच बोरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा वारंवार गौरव झाला आहे. सरकारच्या जिल्हा निहाय एचएमआयएस व RCH रँकिंग मध्ये मागील काही महिन्यांपासून बोराखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र टॉप थ्री मध्ये आहे. याशिवाय केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री ना. जाधव यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकारच्या जिल्हा निहाय एचएमआयएस व रँकिंगमध्ये जिल्हा देखील नंबर एक वर आहे. आरोग्य विषयक कामकाजामध्ये जिल्हा नंबर एकवर असताना, आणि ज्यांच्या भरवशावर जिल्ह्याने क्रमांक एकचे स्थान पटकावले आहे अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त भावना आहेत. बोराखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता नसल्याचे निरीक्षण मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांनी नोंदवले आहे मात्र वास्तवात बोराखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाई कर्मचारी हा मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्याच बंगल्यावर सफाईसाठी ठेवण्यात आल्याचे खास सूत्रांनी सांगितले. एकंदरीत बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात स्वतःला सुपर पॉवर समजत असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे..