देऊळगाव राजा शिवसेनेत ताना– तानी! कॉलर पकडली धक्काबुक्की झाली! आजी माजी पदाधिकारी भर बैठकीत आमने सामने! खा.जाधव आणि माजी आ.खेडेकर समर्थकांची गटबाजी

 
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्याच्या सत्ताधारी शिवसेनेत प्रचंड गटबाजी पहायला मिळत आहे. बुलढाणा आणि चिखलीत खा.जाधव आणि आ. गायकवाड समर्थकांचे दोन गट आहेत. सिंदखेडराजा मतदार संघातही खा.जाधव आणि माजी आ.खेडेकर समर्थक अशी गटबाजी झाली आहे. काल,१५ एप्रिलला ही गटबाजी प्रचंड उफाळून आली. देऊळगाव राजा येथील वृंदावन लॉन मध्ये देऊळगाव राजा तालुका शिवसेनेची आढावा बैठक नवनियुक्त लोकसभा संपर्कप्रमुख संजय सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती..या बैठकीसाठी काही माजी पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते..त्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले. माजी तालुकाप्रमुख अनिल चित्ते, माजी उपजिल्हाप्रमुख दिपक बोरकर यांचा गट संजय सोनार यांचा सत्कार करण्यासाठी बैठक स्थळी आला..यावेळी विद्यमान तालुकाप्रमुखांनी माजी पदाधिकाऱ्यांना सत्कार करण्यास मनाई केली..त्यावरून दोन्ही गट आमने सामने आले.. बैठकीत धक्काबुक्की झाली.. कॉलर पकडापकडी झाली..त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत..
नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान तत्कालीन तालुकाप्रमुख अनिल चित्ते आणि तेव्हाचे उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर यांना पदावरून हटवून त्यांची जागी माजी आमदार खेडेकरांचे समर्थक असलेल्या सुदाम काकड आणि दिनकर खरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. माजी आ.खेडेकरांच्या सांगण्यावरूनच "पदाधिकाऱ्यांना हटवणे आणि नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती" हा कार्यक्रम पडल्याचे माजी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपा दरम्यानही माजी आ.खेडेकरांनी मनमानी केल्याचा माजी पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. काही माजी पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक लढण्याची तयारी सुरू केल्याने त्यांना माजी आ. खेडेकरांकडून पदावरून हटवल्याचेही शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळात बोलले जाते. दरम्यान तेव्हापासूनच आजी माजी पदाधिकाऱ्यांचा हात वाद विकोपाला गेला होता.

 काल देऊळगावराजा शिवसेनेच्या आढावा बैठकीला नवनियुक्त लोकसभा संपर्कप्रमुख संजय सोनार, माजी आ.खेडेकर आणि जिल्हाप्रमुख बळीराम मापारी उपस्थित होते. बैठक सुरू असतांना माजी तालुका प्रमुख अनिल चित्ते, दिपक बोरकर यांच्यासह काही शिवसैनिक बैठकीच्या ठिकाणी पोहचले..त्यांनी "शिवसेना जिंदाबाद" ची घोषणाबाजी केली. त्यानंतर लोकसभा संपर्कप्रमुख संजय सोनार यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र तालुकाप्रमुख सुदाम काकड, उपजिल्हाप्रमुख दिनकर खरात यांच्यासह काही विद्यमान पदाधिकाऱ्यांनी "सध्या सत्कार नको, नंतर करा" असे सांगितले. दरम्यान थोड्यावेळाने देखील चित्ते आणि बोरकर यांना संजय सोनार यांचा सत्कार करू देण्यात आला नाही..त्यामुळे बैठकीच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले.  धक्काबुक्की आणि पकडा पकडी पर्यंत हा वाद पोहचला..

 दरम्यान या संदर्भात ने एका माजी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की  या वादाला माजी आमदार शशिकांत खेडेकर कारणीभूत आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात माजी आ.खेडेकर यांनी मनमानी केली. कारण नसतांना डॉ. शिंगणेंशी युती केली..ज्या धनुष्यबाणासाठी शिवसैनिकांनी विरोधकांना अंगावर घेतले तो धनुष्यबाण निवडणुकीत गोठवला.. ज्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली त्यांच्यावर कारवाया केल्या. जिल्हा परिषद सर्कल मध्ये जे उमेदवार निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत त्यांच्यावर माजी आ.खेडेकर दात धरून आहेत, कारण त्यांना कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी द्यायची आहे असेही या माजी पदाधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान या संदर्भात माजी आ. खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.