शेतातल्या पत्र्याच्या घराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; आंब्याच्या झाडाखाली सतरंजीवर बसून खाल्ली काळण्याची भाकरी अन् ठेचा!

शेतकऱ्याच्या मुलीला पोलीस बनविण्यासाठी, तर मुलाच्या उच्च शिक्षणासाठी मदतीचा दिला शब्द! दोन लाख रुपये रोख दिले...
 
मेहकर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर येथे आयोजित दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळाव्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दामोदर इंगळे आणि कमलाबाई इंगळे या शेतकरी दाम्पत्याच्या शेतातील साध्या पत्र्याच्या घराला भेट दिली. यावेळी शेतातील आंब्याच्या झाडाखाली सतरंजी अंथरून शिंदे यांनी इंगळे कुटुंबीयांसोबत काळण्याची भाकरी, ठेचा आणि भाजीचा आस्वाद घेतला. कमलाबाई यांनी सकाळपासूनच जेवणाची तयारी केली होती. त्या माऊलीचा प्रेमळ आग्रह पाहून शिंदे यांनीही त्यांच्यासोबत जेवण घेतले.

या भेटीदरम्यान शिंदे यांनी इंगळे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. इंगळे यांच्या मुलीने आपल्याला पोलीस व्हायचे असल्याचे सांगितले, तर मुलगा बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेत असल्याची माहिती दिली. दुष्काळाच्या संकटातही आपल्या मुलांना शिकविण्यासाठी धडपडणाऱ्या या शेतकरी दाम्पत्याला शिंदे यांनी धीर दिला. मुलीच्या पोलीस होण्याच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी आणि मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्याची जबाबदारी शिवसेना घेईल, असा शब्द त्यांनी दिला. केवळ आश्वासन देण्यापुरते न थांबता या कुटुंबाला मदत करण्यासाठी त्यांनी तेथेच पुढाकार घेतला.

मेहकर येथील दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळाव्यातही शिंदे यांनी या भेटीचा आवर्जून उल्लेख केला. “त्या माऊलीचा आग्रह एवढा होता की, मला तिथे जेवल्याशिवाय येता आलं नाही. मीदेखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांच्या वेदना मला समजतात. माझ्या आईची तडमड, तिची काटकसर मी पाहिली आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.एकीकडे मेहकरमध्ये हजारोंच्या उपस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा मेळावा, तर दुसरीकडे शेतातील साध्या पत्र्याच्या घरासमोर आंब्याच्या सावलीत शेतकरी कुटुंबासोबत भोजन आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा शब्द, असे चित्र एकनाथ शिंदे यांच्या बुलढाणा जिल्हा दौऱ्यात पाहायला मिळाले.