बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजार मदत द्या! उद्धव सेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी..!

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकर व लोणार तालुक्यांसह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रु. ५० हजार म्हणजेच प्रति एकरी रु. २० हजार अनुदान तसेच इतर अनुषांगिक लाभ देण्यात यावेत, अशी ठोस मागणी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन केली.
निवेदनात आमदार सिद्धार्थ खरात यांनी म्हटले आहे की, मे २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मूग, भुईमूग व हळदीसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. खरीप पेरण्या सुरू झाल्यानंतर अवघ्या १०-१५ दिवसांत म्हणजेच २५ व २६ जून रोजी मेहकर व लोणार तालुक्यातील १६ मंडळात ढगफुटी सदृश अतिवृष्टी होऊन २१२ मि.मी. पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेती खरडून गेली तर उर्वरित शेती जलमय झाली. परिणामी पिकांची मुळे कुजून गेली असून उभी पिके पिवळी पडून पूर्णपणे नापिकी झाली आहेत.

पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असतानाच दिनांक २२ रोजी पुन्हा लोणार व मेहकर तालुक्यात ढगफुटी सदृश अतिवृष्टी होऊन मोठे नुकसान झाले. त्यानंतर १७ ते २० ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे उरलीसुरली पिके देखील हातातून गेली आहेत.

या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मेहकर व लोणार तालुक्यांसह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी ठोस मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून केली व मागणीचे निवेदन त्यांना दिले.