विविध मागण्यांसाठी सिटू महिला कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय जेलभरो आंदोलन; अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, पोषण आहार कर्मचारी हजारोच्या संख्येने सहभागी..

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, योजना कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सिटू संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत देशव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले.

 आंदोलनात जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकल्यानंतर सिटू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रतिनिधिक स्वरूपात जेलभरो आंदोलन केले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.