बकरी ईद शांततेत व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरी करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन! जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली शांतता समितीची बैठक....
जिल्हाधिकारी डॉ. देवरे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये यापूर्वीच शांतता समितीच्या बैठका पार पडल्या असून, सर्व सदस्यांनी सण शांततेत साजरा करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण असून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. तसेच तात्पुरत्या कत्तलखान्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी आपल्या परिवारासह हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा.
जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे यांनी सांगितले की, ईदच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका आणि पशुसंवर्धन विभाग पूर्णपणे सज्ज आहे. प्रतिबंधित जनावरांची अवैध तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सीमांवर आणि संवेदनशील ठिकाणी २४ तास कार्यरत राहणारे विशेष चेक नाके (तपासणी नाके) उभारण्यात आले आहेत. संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी या नाक्यांवर अहोरात्र लक्ष ठेवून असतील. कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर हालचाल किंवा सामाजिक शांतता भंग होण्याबाबत काहीही संशयास्पद माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक तांबे यांनी केले.