बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी; आता चुरस वाढणार; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक कार्यक्रमाची इच्छुकांना प्रतीक्षा..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सन २०२२ पासून प्रशासक राज असलेल्या बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने आता सर्वांनाच संधी राहणार आहे. त्यामुळे, जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत चांगलीच लढत हाेणार असल्याचे चित्र आहे. दम्यान,९ सप्टेंबर राेजी राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण साेडत जाहीर करण्यात आल्याने आता लवकरच निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे, इच्छुकांचे लक्ष आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुक कार्यक्रमाकडे लागले आहे. 

बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपद हे गत काही वर्षांपासून कुठल्या ना कुठल्या प्रवर्गासाठी राखीव निघत हाेते. गेल्यावेळी ओबीसी महिलेसाठी राखीव असलेल्या या पदावर काॅंग्रेसच्या मनिषा पवार या विराजमान हाेत्या. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासक राज सुरू हाेते.आता स्थानिक स्वराज संस्थांच्या नुकताच अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षणही जाहीर करण्यात आल्याने आता इच्छुकांना निवडणुक कार्यक्रमाची प्रतीक्षा लागलेली आहे.