बुलढाण्यात १८ वर्षांनंतर रंगणार विद्यापीठाचा युवा महोत्सव! राजर्षी शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात तयारी अंतिम टप्प्यात; २९ सप्टेंबरला उद्घाटन...
२०२६ हे वर्ष संत गाडगेबाबा यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या युवा महोत्सवाची संकल्पना संत गाडगेबाबा यांच्या विचारांवर आधारित असणार आहे.
२९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान बुलढाणा येथील राजर्षी शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात हा युवा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाच्या आयोजनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. यासंदर्भात विद्यार्थी विकास विभागाच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन महोत्सवाची सविस्तर माहिती दिली.
या युवा महोत्सवात तब्बल २८ कला प्रकारांमध्ये स्पर्धा होणार असून, आतापर्यंत २०५ महाविद्यालयांनी प्रवेश निश्चित केला आहे. जवळपास ६ हजार स्पर्धक या महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, युवा महोत्सवासाठी बुलढाण्यात येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचे उत्स्फूर्तपणे स्वागत करावे, त्यांना आवश्यक सूचना व सहकार्य करावे, असे आवाहन द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशनच्या सचिव अॅड. कीर्ती पऱ्हाड यांनी बुलढाणेकरांना केले आहे.