शेतीच्या वादातून रक्तपात! नागापूरमध्ये एकाचा खून; दोन अत्यवस्थ तर पाच जखमी!

 
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : डोणगावपासून जवळ असलेल्या नागापूर येथे १०  नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शेतीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर तर पाच जण जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नागापूर येथील सय्यद कुटुंब आणि अमडापुर तसेच मंगरूळ नवघरे येथील आप्त नातेवाईकांमध्ये अंजनी बु शेतशिवारातील शेतीवरून वाद सुरू होता. या वादाने १० नोव्हेंबर रोजी हिंसक रूप धारण केले.

दहा नोव्हेंबरच्या दुपारी अमडापूर व मंगरूळ नवघरे येथील सुमारे नऊ जण शेतीत गेले असता, नागापूर येथील सय्यद कुटुंबातील काही जणांनी दबा धरून लोखंडी पाईप व काठीने हल्ला चढविला. या हल्ल्यात शेख अय्याज शेख वाहेद (वय ३६) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर रिजवाना बी जाबीर खान आणि जाबीर खान शब्बीर खान हे गंभीर जखमी असून त्यांना बुलढाणा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर पाच जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांनी तत्काळ काही संभाव्य आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी डोणगाव पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.