जन्म-मृत्यू नोंदणीची प्रकरणे आता न्यायालयात! बुलडाणा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विजय सावळेंच्या पाठपुराव्याला मोठे यश; नागरिकांसाठी प्रक्रिया होणार अधिक पारदर्शक

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जन्म आणि मृत्यू नोंदणीच्या विलंबित प्रकरणांबाबत बुलढाणा जिल्हा वकील संघाने शासन व प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) अधिनियम, २०२६ लागू झाल्यानंतर दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर करावयाची जन्म अथवा मृत्यू नोंदणीची प्रकरणे आता संबंधित न्यायालयात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

 ​या महत्त्वपूर्ण विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विजय सावळे यांनी पुढाकार घेतला होता. जन्म व मृत्यू नोंदणीसंदर्भात देशभरात एकसमान कार्यपद्धती निश्चित करावी, तसेच विलंबित नोंदणीसाठी स्पष्ट आणि कडक कायदेशीर प्रक्रिया लागू करावी, अशी मागणी जिल्हा वकील संघाच्या वतीने ९ जून रोजी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या माध्यमातून शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

विविध ठिकाणी जन्म-मृत्यू नोंदणीसाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जात असल्याने नागरिकांना अनावश्यक अडचणी आणि त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचेही या निवेदनातून शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करत ॲड. विजय सावळे यांनी या प्रश्नाला कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर ठोस दिशा देण्याचे काम केले.

दरम्यान, जन्म व मृत्यूच्या विलंबित नोंदणीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) अधिनियम, २०२६ मंजूर केला आहे. त्यानुसार जन्म किंवा मृत्यूची नोंद दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर करावयाची असल्यास संबंधित न्यायालयाची प्रक्रिया लागू होणार आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये न्यायालयीन छाननीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे, सुधारणा अधिनियमातील तरतुदी आणि बुलढाणा जिल्हा वकील संघाने ९ जून रोजी शासनाकडे मांडलेल्या मुद्द्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा वकील संघाने वेळेपूर्वी उपस्थित केलेल्या या महत्त्वपूर्ण प्रश्नाचे गांभीर्य आणि ॲड. विजय सावळे यांच्या पाठपुराव्याची परिणामकारकता अधोरेखित झाली आहे.

याबाबत बोलताना ॲड. विजय सावळे यांनी सांगितले की, सुधारणा अधिनियम लागू झाल्यामुळे विलंबित तसेच संशयास्पद जन्म-मृत्यू नोंदणीवर प्रभावी नियंत्रण आणण्यास मदत होईल. त्याचबरोबर नागरिकांना अधिक सुस्पष्ट, पारदर्शक आणि कायदेशीर प्रक्रिया उपलब्ध होणार आहे.एकूणच, जन्म-मृत्यू नोंदणीसारख्या संवेदनशील आणि नागरिकांच्या मूलभूत कागदपत्रांशी संबंधित विषयावर बुलढाणा जिल्हा वकील संघाने घेतलेली भूमिका आणि ॲड. विजय सावळे यांनी केलेला पाठपुरावा आता प्रत्यक्ष कायदेशीर प्रक्रियेत प्रतिबिंबित होत असल्याने जिल्ह्यातील कायदेवर्तुळातून समाधान व्यक्त होत आहे.