BIG BREKING  मेहकर, लोणारला जाणवले भूकंपाचे धक्के? बुलडाणा जिल्हा प्रशासनाने केले "हे" आवाहन....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  आज ९ जुलैच्या पहाटे हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यातील काही भागांत देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान अधिकृत नोंदीनुसार भूकंपाच्या चार धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे 4.6,3.6,3.9,4.1 रिश्टर होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली होता असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पहिला धक्का १ वाजून ३७ मिनिटांनी, दुसरा धक्का २ वाजून १५ मिनिटांनी, तिसरा धक्का २ वाजून १७ मिनिटांनी तर चौथा धक्का३ वाजून २३ मिनिटांनी जाणवला. 

या भूकंपात प्राथमिक माहितीनुसार कसलीही जीवितहानी किंवा वित्तहानीची नोंद नाही. यासंदर्भात बुलढाणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली येथे आहे. लोणार आणि मेहकर तालुक्यातील काही भागात या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी भूकंपाचे धक्के बसत असताना पटकन मोकळ्या जागेत जावे, विशेषतः कच्चे बांधकाम असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहनही बुलडाणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना केले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहिती व सूचनांचीच नोंद घ्यावी असेही ते म्हणाले.बुलडाणा  जिल्ह्यातील कुठल्याही आपत्ती संदर्भात माहिती देण्यासाठी 7020435954 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.