सुंदरखेड येथे ‘आऊषा फाउंडेशन’तर्फे महिला संवाद मेळावा उत्साहात; स्नेहाताई भंडारे म्हणाल्या, एक महिलाच समजू शकते दुसऱ्या महिलेचे प्रश्न ! विविध विषयांवर सौ. भंडारेंनी साधला माय–माऊल्यांशी  संवाद...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :- आज महिला शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच सार्वजनिक जीवनात सक्षमपणे कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक समस्या वेगळ्या स्वरूपाच्या असून त्या समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यासाठी संवेदनशील आणि सक्षम नेतृत्वाची गरज आहे, असे प्रतिपादन ‘आऊषा फाउंडेशन’च्या अध्यक्षा स्नेहा सिद्धार्थ भंडारे यांनी केले. सुंदरखेड येथे ‘आऊषा फाउंडेशन’च्या पुढाकारातून रविवारी महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात स्नेहा भंडारे यांनी महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि प्रश्न जाणून घेतले. महिलांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्या, हक्क, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, स्वावलंबन तसेच सामाजिक विकासाशी निगडित विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

गेल्या अनेक वर्षांपासून ‘आऊषा फाउंडेशन’च्या माध्यमातून महिलांसाठी कार्य करत असल्याचे नमूद करत, भविष्यातही हे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहील, असे स्नेहा भंडारे यांनी सांगितले. महिलांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी महिलांनीच पुढे येणे आवश्यक असून एक महिलाच दुसऱ्या महिलेचे दुःख अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संवाद मेळाव्यात महिलांनी मोकळेपणाने आपली मते मांडली. महिलांचा आत्मविश्वास, सक्रिय सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता महिलांच्या प्रश्नांसाठी अधिक ठामपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. महिलांच्या सहभागातून सशक्त कुटुंब आणि प्रगत समाज घडवता येईल, अशी भावना या संवादातून व्यक्त झाली.या महिला संवाद मेळाव्यास सुंदरखेड परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.