अजितदादा अमर रहे’च्या जयघोषात अस्थी विसर्जन; सर्वसामान्यांचा आधारवड हरपला – डॉ.शिंगणे

 
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अस्थींचे ५ फेब्रुवारी रोजी श्री संत चोखामेळा जलाशयात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आणि ‘अजितदादा अमर रहे’च्या गगनभेदी घोषणांमध्ये विसर्जन करण्यात आले. भावुक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्व स्तरांतील नागरिकांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अस्थिकलशाची यात्रा राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून सुरू होऊन जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ व गावागावांत फिरवण्यात आली. या यात्रेचा समारोप संत चोखामेळा जलाशय येथे झाला.

शोकसभेत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते दादाराव खार्डे, शिवसेना नेते दीपक बोरकर, रिपब्लिकन पार्टीचे नेते भाई दिलीप खरात आदींनी मनोगत व्यक्त करत स्व. अजितदादांना श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी म्हणाले की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अजितदादांच्या अस्थी पाठवण्यात आल्या; मात्र बुलढाणा हा एकमेव जिल्हा ठरला जिथे संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ व गावात अस्थिकलश दर्शनासाठी नेण्यात आला. “अजितदादांच्या रूपाने गोरगरिबांची न्यायदेवता हरपली,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

शोकसभेत बोलताना राज्याचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, “अजितदादांचा अस्थिकलश घेऊन जेव्हा आम्ही प्रत्येक गावात गेलो, तेव्हा केवळ एक नेता नव्हे तर प्रत्येक कुटुंबातील आधार गमावल्याची भावना नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्यांच्या जाण्याने सर्वसामान्यांचा हक्काचा आधारवड हरपला आहे.”

यावेळी बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, सिंदखेड राजाचे नगराध्यक्ष सौरभ तायडे, देऊळगाव राजाच्या नगराध्यक्षा माधुरी शिपणे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, डॉ. रामप्रसाद शेळके, भाजपा नेते गणेश मांटे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि अजितदादांवर प्रेम करणारे हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.