कुत्रे हाकलण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती! मेहकर नगरपालिकेने शिक्षकांची गरिमा पायदळी तुडवली; शाळांच्या फलकांवरून संताप...
मेहकर शहरातील नगरपालिका शाळांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असल्याने प्रशासनाने कुत्रे हाकलण्यासाठी, कुत्री प्रसूत झाल्यास त्याचा बंदोबस्त करण्यासाठी, तसेच शाळेच्या भिंती, गेट आदी बाबी तपासण्यासाठी एका शिक्षकाला ‘नोडल अधिकारी’ म्हणून नेमण्याचे आदेश दिले. धक्कादायक बाब म्हणजे, या जबाबदारीसाठी संबंधित शिक्षकांचे नाव थेट शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर फलकाद्वारे लावण्यात आले.
या प्रकारामुळे पालकवर्ग, शिक्षणप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“ज्या शिक्षकांकडून आमची मुले आदर्श घेत आहेत, त्या शिक्षकांचे नाव कुत्रे हाकलण्यासाठी फलकावर लावले जाते, हे दुर्दैवी आणि अपमानास्पद आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी दिली.
नगरपालिका कर्मचाऱ्यांऐवजी शिक्षकच का?
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असला तरी, त्यासाठी शिक्षकांना जबाबदार धरणे म्हणजे शिक्षण व्यवस्थेची अवहेलना असल्याचे मत व्यक्त होत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा असेल, तर त्यासाठी नगरपालिका आरोग्य विभाग किंवा संबंधित कर्मचारी नियुक्त करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने थेट शिक्षकांवर ही जबाबदारी ढकलल्याने “शिक्षक म्हणजे सर्व समस्यांचे उत्तर” असा दृष्टिकोन पुन्हा एकदा उघड झाला आहे.
११ शाळा, ११ शिक्षक ‘कुत्रे बंदोबस्त’साठी
मेहकर नगरपालिकेच्या हद्दीत एकूण ११ नगरपालिका शाळा असून, त्या प्रत्येक शाळेत एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
याबाबत प्रभारी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर धांडे म्हणाले,
“मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी न्यायालयाने शासनाला आणि शासनाने नगरपालिकांना आदेश दिले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने मुख्याध्यापकांना पत्र देऊन एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास सांगितले आहे.”
या निर्णयामुळे आता नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि राजकीय इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिक्षकांचे मुख्य काम अध्यापन असताना, त्यांना कुत्रे हाकलण्याच्या कामात गुंतवणे म्हणजे शिक्षण व्यवस्थेची विटंबना असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.