वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द; शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींच्या लग्नासाठी खर्च करणार! आमदार संजय गायकवाडांची मोठी घोषणा;
विशेष म्हणजे, या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहांच्या संख्येवर कोणतेही बंधन राहणार नाही. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन यांसह कोणत्याही धर्मातील पात्र वधू-वरांना या सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. केवळ शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपुरते मर्यादित न राहता नवविवाहित जोडप्यांना अधिकाधिक मदत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. वधूंना मंगळसूत्र, दोन साड्या यासह आवश्यक साहित्य देण्याचे नियोजन करण्यात येत असून, जवळपास ५० हजार नागरिकांच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ३० एप्रिल २०२७ पर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे. या कालावधीत जेवढ्या पात्र वधू-वरांची नोंदणी होईल, त्या सर्वांचा विवाह सोहळ्यात समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर महिनाभरात संपूर्ण नियोजन करून २९ मे रोजी हा भव्य विवाह सोहळा पार पडणार आहे. २९ मे रोजी माझा वाढदिवस असतो. मात्र, यंदा वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून त्यासाठी होणारा खर्च या सामूहिक विवाह सोहळ्यावर करणार असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांना मुलींच्या विवाहासाठी आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.