अफलातून... शेतकऱ्याला लावायचाय हर्बल गांजा!
 

देऊळगाव महीच्या कर्जबाजारी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना मागितली परवानगी
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात लावलेल्या भाजीपाल्याला भाव मिळत नाही. देऊळगाव राजा तालुक्यालाही अतिवृष्टीच्या निकषातून वगळले. त्यामुळे तोट्यात आलेल्या शेतीला नफ्यात आणण्यासाठी नवाब मालिकांच्या जावयाकडे सापडलेल्या हर्बल गांजाची शेती करण्यास परवानगी द्यावी व गांजाचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथील शेतकरी मधुकर उत्तमराव शिंगणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तहसीलदारांच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून, पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनाही पत्राची प्रत पाठवली आहे.

देऊळगाव मही येथील शेतकरी मधुकर उत्तमराव शिंगणे यांच्याकडे वडिलांच्या नावाने असलेली अडीच एकर शेती आहे. शेतात त्यांनी टोमॅटो व कांद्याचे पीक घेतले होते मात्र पावसाळ्यात पिकांचे नुकसान झाले. टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली व उत्पादन खर्चही निघाला नाही. शेतात कोणतेही पीक घेतले तरी शासन हमीभाव देत नाही. त्यामुळे शेती तोट्यात असल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाल्याचेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात कळवले आहे.

घर चालविणे कठीण झाल्याने व उत्पन्‍न घेऊनही उपासमारीची वेळ येत असल्याने हर्बल गांजा लागवडीची परवानगी व बियाणे उपलब्ध करून द्यावे. महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाच्या शेतात हर्बल गांजा सापडला व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी त्याचे समर्थन केले. त्यामुळे बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी मला गांजा बियाणे उपलब्ध करून द्यावा. मला आत्महत्या करायची नसून जगायचे आहे, असेही पत्रात म्हटले आहे.