जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१ गावांसाठी ५८ विंधण विहिरी व १० कुपनलिकांना प्रशासकीय मंजुरी;
जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आदेश; कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना!
या आदेशानुसार मंजूर कामे शासनाच्या सर्व नियम व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पूर्ण करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कामे सुरू करण्यापूर्वी कमी खर्चाच्या पर्यायी उपाययोजना शक्य नसल्याची खात्री करणे बंधनकारक राहणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, नव्या विंधण विहिरी अथवा कुपनलिका सुरू करण्यापूर्वी नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच कामांचे जिओ-टॅगिंग करून छायाचित्रांसह नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित कामे ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण न झाल्यास मंजुरी आपोआप व्यपगत होणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विंधण विहिरी पूर्ण झाल्यानंतर संबंधित गावांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यास टँकरद्वारे अथवा खाजगी विहीर अधिग्रहणाद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा बंद करण्याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अपूर्ण राहिलेल्या कामांचे देयक पाणीटंचाई निधीतून अदा करण्यात येणार नसल्याचा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.