जिल्ह्यात झाला रेकॉर्ड! ना.प्रतापराव जाधवांच्या पुढाकारातून लोणार येथे योग महोत्सवाचे भव्य आयोजन; ६ हजार साधकांनी एकाच वेळी त्रिकोणासन करून विक्रम नोंदविला....

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावर आयोजित योग महोत्सवात केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी एकाच वेळी तब्बल ६ हजार योगसाधकांनी ‘त्रिकोणासन’ करून ‘Asia Book of Records’ व ‘India Book of Records 2026’ मध्ये नोंद होईल असा विक्रम प्रस्थापित केला.
या प्रसंगी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की, योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो एक समग्र जीवनशैली आहे. योगामुळे शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन साधले जाते. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात मानसिक शांती, शारीरिक सुदृढता आणि सकारात्मक जीवनदृष्टीसाठी योग अत्यंत आवश्यक ठरतो.

आंतरराष्ट्रीय योग दिनाला ७५ दिवस शिल्लक असताना योगाचा प्रसार आणि जनजागृती व्हावी या उद्देशाने हा योग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. गैर-संचारी रोगांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, नियमित योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यान यांच्या माध्यमातून मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि तणाव यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येते, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला आयुष विभागाच्या सहसचिव मोनालिसा दास, जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच सौ. राजश्रीताई जाधव, रमेश चौहान, डॉ. काशिनाथ, सौ. मीराताई मापारी, प्रकाश मापारी, बळीराम मापारी, अनंत बिरादार, सोहम वायाळ आदी मान्यवरांनीही सहभाग नोंदविला.

 विक्रमाची अधिकृत नोंद
‘आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२६’ च्या १०० दिवसीय काउंटडाउनमधील ७५ व्या दिवशी आयोजित या योग महोत्सवात ६ हजार साधकांनी एकत्रितपणे ‘त्रिकोणासन’ केल्याची अधिकृत नोंद ‘Asia Book of Records’ आणि ‘India Book of Records 2026’ मध्ये करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीचे प्रमाणपत्र केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांना प्रदान करण्यात आले.योग महोत्सवात मोठ्या संख्येने साधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.