उद्यापासून महाराष्ट्रातील शेतकरी संघर्षाचा नवा अध्याय! रविकांत तुपकरांच्या 'दुष्काळ संघर्ष यात्रे'चा मलकापुरातून होणार शंखनाद; गावागावांत धडकणार शेतकऱ्यांचा आवाज!
दुष्काळ, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, शेतमालाचे घसरलेले भाव आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी रविकांत तुपकर यांनी दुष्काळ संघर्ष यात्रेची घोषणा केली होती. या घोषणेनंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावपातळीवर तयारी सुरू केली असून, आता प्रत्यक्ष यात्रेला प्रारंभ होत आहे. विशेष म्हणजे, ही यात्रा केवळ राजकीय भाषणे किंवा जाहीर सभांपुरती मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणे, दुष्काळाची प्रत्यक्ष परिस्थिती पाहणे, शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांच्या समस्या ऐकणे, गावागावांत जनजागृती करणे आणि शेतकऱ्यांना संघटित करणे, असे या यात्रेचे स्वरूप असणार आहे.
उद्या मलकापुरातून संघर्षाचा श्रीगणेशा; पहिल्या दिवशी देवधाब्यात जाहीर सभा!
शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मलकापूर शहरातील शहीद संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकापासून यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता बेलाड, दुपारी १ वाजता हिंगणी, दुपारी २ वाजता जांभूळधाबा, अडीच वाजता आळंद, दुपारी ३ वाजता खामखेड, ४ वाजता भालेगाव, साडेचार वाजता कुंड आणि सायंकाळी साडेपाच वाजता रनथम येथे यात्रा पोहोचणार आहे.
सायंकाळी ६ वाजता विवरा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर सायंकाळी ७ वाजता देवधाबा येथे भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेत रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय भूमिका मांडतात, सरकारला कोणता इशारा देतात, याकडे लक्ष लागले आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी विविध गावांतील शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचे नियोजन संघटनेने केले आहे.
असा असेल दुसरा दिवस..
रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता माकनेर येथून दुसऱ्या दिवसाच्या नियोजित कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सकाळी १० वाजता काटी, ११ वाजता विटाळी, दुपारी १२ वाजता सिरसोडी, दुपारी १ वाजता चांदूरबिस्वा आणि दुपारी २ वाजता दिघी येथे यात्रा पोहोचेल. दिघी येथे भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.त्यानंतर दुपारी ४ वाजता वडनेर, सायंकाळी ५ वाजता अलमपूर आणि सायंकाळी ७ वाजता निमगाव येथे यात्रा पोहोचणार असून, निमगावात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे पहिल्या दोन दिवसांतच विविध गावांतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यावर तुपकरांचा भर असणार आहे.
कर्जमाफीपासून हेक्टरी एक लाखाच्या मदतीपर्यंत; सरकारसमोर मागण्यांचा डोंगर!
या संघर्ष यात्रेच्या केंद्रस्थानी शेतकऱ्यांच्या आर्थिक अस्तित्वाचा प्रश्न असणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरची कोणतीही मर्यादा न घालता हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत.त्याचबरोबर कापसाला प्रतिक्विंटल १५ हजार रुपये, सोयाबीनला १२ हजार रुपये भाव मिळावा, कापसावरील शून्य आयात शुल्काचा निर्णय मागे घेऊन आयात शुल्क ३० टक्के करावे, सोयापेंड आयात थांबवावी आणि शेतमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशा मागण्यांसाठीही संघर्ष केला जाणार आहे.खासगी फायनान्स कंपन्या आणि मायक्रोफायनान्स संस्थांकडून होत असलेल्या कथित सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात कठोर कायदा करावा, दुष्काळग्रस्त शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करावे, या मागण्यांचाही यात्रेदरम्यान आग्रह धरला जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या दारात जाणार तुपकर; गावात मुक्काम, बांधावर संवाद अन् सरकारला जाब!
या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रविकांत तुपकर गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. दुष्काळामुळे शेतीचे किती नुकसान झाले? शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष किती उत्पन्न आले? सरकारकडून किती मदत मिळाली? बँका आणि खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुलीमुळे कोणत्या अडचणी निर्माण झाल्या? अशा प्रश्नांची माहिती यात्रेदरम्यान घेतली जाणार आहे.शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे, गावांमध्ये मुक्काम करणे, स्थानिक समस्या समजून घेणे, सभा आणि जनजागृतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणे, असा यात्रेचा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे ही यात्रा केवळ आंदोलनाची घोषणा न राहता दुष्काळग्रस्तांच्या व्यथा थेट सरकारपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम ठरावे, असा संघटनेचा प्रयत्न आहे.
४ डिसेंबरला बुलढाण्यात शेतकऱ्यांचा एल्गार; नागपूर अधिवेशनाआधी सरकारची कोंडी करण्याची तयारी!
१४ नोव्हेंबरला मलकापुरातून सुरू होणारी ही यात्रा जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतील अनेक गावांतून प्रवास करणार आहे. ४ डिसेंबर रोजी बुलढाणा शहरात भव्य एल्गार महामोर्चाने या यात्रेची सांगता होणार आहे. या महामोर्चात जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी संघटनेने तयारी सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, ७ डिसेंबरपासून नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अवघ्या तीन दिवस आधी हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळ, कर्जमाफी, शेतमालाचे भाव आणि कर्जवसुलीच्या प्रश्नांवर सरकारवर दबाव निर्माण करण्याची रणनीती तुपकरांनी आखल्याचे दिसून येते. यात्रेदरम्यान शेतकऱ्यांचा किती प्रतिसाद मिळतो, गावागावांतून किती मोठ्या प्रमाणावर शेतकरी संघटित होतात आणि त्याचे रूपांतर ४ डिसेंबरच्या महामोर्चात कशा प्रकारे होते, यावर या आंदोलनाची पुढील दिशा अवलंबून असणार आहे.दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ही संघर्ष यात्रा असल्याचे रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले आहे. शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, महिला आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी उभारण्यात येणाऱ्या या लढ्यात दुष्काळग्रस्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.