बिग ब्रेकिंग! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे मतदारसंघ वाढविण्यास "ग्रामविकास'ची हिरवी झेंडी!! बुलडाण्यातही होणार वाढ

 
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगरपालिका, महापालिकांच्या धर्तीवर आता राज्यातील जिल्हापरिषदा व पंचायत समित्यांचे मतदारसंघ वाढणार आहेत. ग्रामविकास मंत्रालयाने आज, २ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर याला मान्यता दिली असून, परिणामी आता बुलडाणा जिल्हा परिषद आणि १३ पंचायत समित्यांचे मतदारसंघ वाढणार हे नक्की.

कोरोनामुळे नवीन जनगणना झाली नसल्याने लोकसंख्या किती वाढली हे नक्की झाले नसले तरी लोकसंख्या वाढली हे निश्चित. यामुळे राज्य शासनाने अ, ब, क वर्ग नगरपरिषद निहाय प्रभाग वाढविण्यास यापूर्वीच मंजुरी दिली. तसेच त्याचे निकष ठरवून दिले होते.

आता फेब्रुवारी-मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या व निवडणूक अपेक्षित असणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचे गट व गण वाढविण्यास ग्रामविकास मंत्रालयाने ग्रीन सिग्नल अर्थात मान्यता दिली आहे. यापूर्वी जिल्हापरिषदेचे किमान ५० तर कमाल ७५ गट असे प्रमाण होते. आता ग्रामविकासने किमान ५५ तर कमाल ८५  असे प्रमाण निर्धारित केले आहे. यामुळे बुलडाणा जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांचे गण वाढणार हे उघड आहे. यामुळे जिल्हा परिषद किंबहुना राजकीय क्षेत्रात या वाढीचे व्यापक स्वागत होणार हे नक्कीच!

बुलडाण्यात किती?
दरम्यान जि. प. गट व पंचायत समिती गण वाढणार हे नक्की झाल्याने बुलडाणा जिल्ह्यात किती व कशी वाढ होणार याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रशासकीय वर्तुळाचा कानोसा घेतला व  निवडणूक विभागाच्या यापूर्वीच्या कार्यवाही लक्षात घेतल्या तर जिल्ह्यात ६८ जिल्हा परिषद गट होऊ शकतात. मागील निवडणुकीत ६० गट आणि १२० गण होते. यामुळे ८ गट व १६ गण वाढणार अशी दाट शक्यता आहे. परिणामी ६८ जि.प. गट आणि १३६ पं.स. गण राहणार असा व्यापक अंदाज आहे. नजीकच्या काळात यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.