रावणाचे निधन..!; राम म्हणतात…
मुंबई : रामानंद सागर यांच्या रामायण या लोकप्रिय मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदींचे मंगळवारी, ५ ऑक्टोबरला रात्री निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर विविध मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी त्रिवेदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
अरुण गोविल म्हणाले, की अरविंद त्रिवेदी हे माझे चांगले मित्र होते. त्यांच्या जबरदस्त अभिनयामुळे माझे आणि त्यांचे व्यक्तिगत जीवनातही पटत नसेल असे अनेकांना वाटत होते. मात्र त्यांच्यासोबत काम करताना अनेक चांगले अनुभव आहेत. त्रिवेदी ही शंकराचे भक्त होते. आमच्या दोघांमध्ये कधीही स्पर्धा नव्हती. ते माझे अतिशय जवळचे मित्र होते. १० दिवसांपूर्वी त्यांच्याशी फोनवरून बोलणे झाले होते. चांगला मित्र गमावल्याचे दुःख होत असल्याचे अरुण गोविल म्हणाले.