चित्रांगदाने सांगितला कॉलेजमधील तो वाईट अनुभव!
एकेकाळी कॉलेजमध्ये रॅगिंगचं खूप फॅड होतं. सिनियर मंडळी कॉलेजमध्ये नव्याने दाखल होणाऱ्यांची रॅगिंग करायची. सुरुवातीला हा गंमतीपुरता भाग होता म्हणून ठीक होतं, पण नंतर यात विकृती शिरल्याने आणि त्यातून झालेल्या अपमानातून अनेक बळी गेल्याने सरकारला जाग येत तातडीने कायदा निर्माण करून असे प्रकार थांबविण्यात आले. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिलाही अशाच रॅगिंगचा सामना करावा लागला होत. तिला उलटा सलवार परिधान करायला सांगितला गेला. केसांना प्रचंड तेल लावायला सांगितलं गेलं. एका बादलीत सगळी पुस्तक टाकून त्या अवस्थेत रॅम्पवॉक करायला लावला गेला, असं चित्रांगदाने मुंबई लाइव्हला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. हा माझा पहिलाच रॅम्पवॉक. त्यामुळे प्रामाणिकपणे केला आणि नंतर तर कॉलेजच्या फॅशन टीमचा मी एक भागच झाले, असेही ती यावेळी म्हणाली. चित्रांगदा आपल्या अभिनय कौशल्यामुळे सर्वांच्याच लक्षात राहते. आताही ती लवकरच नव्या चित्रपटात झळकणार असून, अभिनेता अभिषेक बच्चनसोबत ती बॉब बिस्वास चित्रपटात दिसणार आहे. यानिमित्ताने तिने मुंबई लाइव्हला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने कॉलेज जीवनातील काही आठवणींनाही उजाळा दिला. कॉलेजच्या पहिल्या दिवशी झालेल्या रॅगिंगबद्दलही सांगितलं. यावेळी चित्रांगदा म्हणाली, की कॉलेजमध्ये असतानाच मला काही मुलींच्या मॉडेलिंगविषयी माहिती मिळाली होती. या मुलींच्या मदतीने मी माझा पोर्टफोलियो शूट केलं. त्यानंतर माझ्या नावाची चर्चा सगळीकडे होऊ लागली. या काळात मी एका जाहिरातीसाठी ऑडिशन दिलं पण त्यात मला रिजेक्ट करण्यात आलं. परंतु, योगायोगाने गुलजार सरांनी मला पाहिले आणि त्यांच्यामुळे मला सनसेट पॉइंट या म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. या अल्बमची निर्मिती त्यांच्या मुलीने म्हणजेच मेघना गुलजार यांनी केली होती, असे ती म्हणाली.